मी खरंतर खाद्यप्रेमी माणूस आहे, पण तरीही गुलाबजाम हा पदार्थ माझ्या आत्यंतिक आवडीचा आहे. म्हणूनच ‘गुलाबजाम’ नावाचा पदार्थ पडद्यावर वाढला जाणार आहे असं जेव्हा कळलं तेव्हा पासून त्या क्षणाची पानासमोर पाटावर बसून आतुरतेने वाट बघत होतो आणि तो पडद्यावर वाढला गेला.
चित्रपट हा एखाद्या पाककृतीसारखाच असतो. कल्पनेचं साहित्य, त्यावर प्रोसेस करून केलेली संहिता, मग त्यावर एकेक कृती करत झालेली चित्रपट नावाची डिश या सगळ्या गोष्टी जमून यायला हव्यात आणि इथं ‘शेफ’ हा अस्सल खवय्या होता त्यामुळे ही ‘फूड फिल्म’ जमून येणार हे नक्कीच होतं.
हि कदाचित पहिली मराठी ‘फूड
फिल्म’ असावी. फूड फिल्म म्हणजे अशी फिल्म ज्यात इतर साहित्य तर असतंच पण
त्याचजोडीने एखाद्या ठिकाणचं फूडकल्चर हे कथानकाचा  प्रमुख भाग
असतो. हॉलीवूडमध्ये अशा काही फिल्म्स आहेत पण बॉलीवूडमध्ये मात्र असा प्रयत्न
झालेला दिसत नाही आणि म्हणूनच सचिनचं कौतुक वाटतं.  सचिन कुंडलकर हा माणूस खवय्या, फिरस्त्या, ब्लॉगर, लेखक आणि दिग्दर्शक आहे. या सगळ्या भूमिका पार पाडत असताना ‘गुलाबजाम’ ही कथा
त्याच्या आतून आली असावी; पण त्याचजोडीने व्यावसायिकतेशी त्याची
उत्तम सांगड घालण्यात आली आहे.  
फॉरेननमध्ये पंजाबी/उडिपी हॉटेल्स वगैरे सुरु झाल्याचं आपल्या कानावर आलेलं
आहेच, पण पारंपारिक मराठमोळ्या हॉटेल्सची वानवा
आहे. तसेच पुण्यात बरेच बॅचलर्स रूममेट्स म्हणून राहतात, त्यांना घरच्या जेवणाची ओढ असते. यामुळेच 'डबे' हा नवा लघुउद्योग पुणे-मुंबईसारख्या शहरात फोफावतो आहे. ह्याच
विषयाला धरून कथानक रचण्यात आलं आहे. 
कथा हा पदार्थ पडद्यावर वाढत असताना तो उत्तम असण्यासोबतच उत्तम दिसणंही
आवश्यक असतं.  याचसाठी वाढत
असताना त्या-त्या जागेवर तो-तो  घटक
वाढण्यात यायला हवा आणि कल्पकतेने सजवला तर उत्तमच, थोडक्यात पटकथा
उत्तमरित्या लिहिली जायला हवी आणि  त्यावर
संवादांचं गार्निशिंगही उत्तम हवं. तेजस मोडक आणि सचिन कुंडलकर ह्या जोडीने तीनही
आघाडींवर उत्तम ‘कुकिंग’ केलंय. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती पडद्यावर दिसतेच, पण त्याचजोडीने संवादांतून ऐकूही येते हे महत्त्वाचं!
ही कथा आहे आदित्य आणि राधाची. पण एका सरळ रेषेत सांगता येण्यासारखं यांचं
नातं नाही, ते गुंतागुंतीचं आहे. या नात्याचे
सुरुवातीला गुरु-शिष्य, मग फुलत गेलेली मैत्री, त्या मैत्रीचं एक वळण असे वेगवेगळे कंगोरे उत्कृष्ट पद्धतीने रेखाटले गेले
आहेत आणि म्हणूनच चित्रपट वेगळा ठरतो. हे नातं असं सरळसोट नसल्यानेच त्यातल्या
भावनिक प्रसंगांमध्ये  वैविध्य आहे. पण
त्याचवेळी एखादा सीन सरळसरळ स्पूनफीडिंग केल्याने कृत्रिम वाटण्याची शक्यता आहे.
पण तरीही तो एखाददुसरा सीन सोडला तर चित्रपट उत्तम जमून आला आहे.
राधा आगरकर आणि आदित्य नाईक या दोन्ही भूमिका सोनाली आणि सिद्धार्थ यांनाच
डोळ्यांसमोर ठेवून लिहिल्याचं अनेक प्रसंगांमध्ये जाणवतं. म्हणूनच कि काय
दोघांनीही तुफान बॅटिंग केलीय. दोघांच्याही कारकिर्दीत हा एक उत्तम चित्रपट आणि
त्यात एक उत्तम भूमिका यांचा समावेश झाला आहे. सिद्धार्थ चांदेकरने handsome, dashing, पण त्याचवेळी कॉर्पोरेटमध्ये work satisfaction नसणाऱ्या तरुणाची भूमिका समर्थपणे पेलली आहे.
त्याच्या काहीकाही भावमुद्रा तर ठसल्या आहेत. सोनाली
कुलकर्णी ही 'काकूबाई' आहे असं
माझं वैयक्तिक मत आहे पण त्याचवेळी तिचं हे 'काकूबाईपण' तिच्या पथ्यावरच पडलं आहे. तिच्या खाष्टपणाला त्यामुळेच एक मराठमोळी झालर आली आहे.    
    
चित्रपट मुख्यतः दोघांवरच आधारित असला
तरीही रेणुका शहाणे हे सरप्राईज पॅकेज आहे  आणि
वाट्याला आलेली छोटी पण अत्यंत महत्त्वाची भूमिका त्यांनी समर्थपणे पेलली आहे.
राधाकडे कामाला असणाऱ्या मावशींचा विशेष ठसका आहे, त्याचजोडीने
पोपट छोट्या भूमिकेत समर्थपणे उभा राहिला आहे. त्याचजोडीने चिन्मय उदगीरकर आणि
मधुरा देशपांडे यांनीही त्यांच्या छोट्या भूमिका चांगल्या निभावून नेल्यात. [पण
तरीही प्रश्न पडतो, मधुरा देशपांडेऐवजी दुसरी कोण असू शकली
असती?] याचजोडीने काल म्हटल्याप्रमाणे ‘रंगीत
शहरातली चक्रम माणसं’ फार जशीच्या तशी आली आहेत. 
पण याचजोडीने यात आलेले पदार्थ; विशेषतः
गुलाबजाम, पुरणपोळी, साध्या
पोळ्या हे पदार्थ मुख्य पात्रंच आहेत असं वाटतं. म्हणूनच ही एक ‘फूड फिल्म’ म्हणून
वेगळी ठरते.  
एखाद्या पदार्थाची फोटोग्राफी करत असताना तो उत्तम दिसण्यासोबतच आकर्षकही
दिसावा लागतो आणि फोटोग्राफीचं मुख्य कौशल्य म्हणजे पदार्थाने बघणाऱ्याच्या
तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. सचिन कुंडलकरच्या पहिल्या फिल्मपासूनचा त्याचा मित्र
सिनेमॅटोग्राफर मिलिंद जोग याच्या कौशल्याने नानाविध पदार्थ दिसत असताना आपल्या
आतला खवय्या TEMPT होत राहतो. हे करत असताना त्याने मुबलक
प्रमाणात केलेला TOP ANGLESचा वापर
प्रामुख्याने लक्षात येतो. सिद्धार्थच्या TOP ANGLESमुळे
त्याच्या प्रसंगातली INTENSITY अधिक गडद झाली
आहे. त्याचजोडीने सिद्धार्थ-सोनालीच्या अनेक फ्रेम्स ह्या काही बोलण्याच्या आधीच
फार बोलून जातात. पुण्याचं आणि लंडनचं  जीवन उत्तम
पद्धतीने रेखाटलं गेलंय, मुख्यतः या दोन्ही जीवनशैलीतला फरक
सुस्पष्टरित्या दाखवण्यात आला आहे.    
 लोकेशन्स
रिअल असतीलही पण  त्यात पुण्याचं
पुणेपण आणि लंडनचं लंडनपण टिकून आहे. पदार्थ एरवी असतात त्यापेक्षा सुयोग्य आणि
सुबक असणं अत्यावश्यक होतं तेही उत्तम झालंय.
त्याचजोडीने लाईटमनचं काम वाखाणण्याजोगं आहे. आधी स्वतःला घरात कोंडून घेणारी
बाई आणि नंतर आदित्यच्या सोबतीने तिच्यात आणि तिच्या घरात होत गेलेले बदल
लाईटसेटिंगमधूनही उत्तमरित्या CAPTURE झालेत.
उगाच पार्श्वसंगीताचा मारा नाहीय, जे आहे ते
उत्तम आणि आवश्यक आहे.
या सगळ्या सोबतीने VFXचं काम उत्तम जमलंय. आधी टायटलला गंमतीखातर वाचलेलं ‘रुचकर पदार्थ’ हे पुस्तक
आठवलंच पण त्यानंतर आदित्य शिकत गेल्यानंतरचा प्रवास VFXमधून उत्तम दाखवला गेला आहे.
विशेषतः राधा आगरकर ही आयुष्याच्या एका बिंदूवर अडकलेली आहे हे दाखवण्यासाठी
घरातल्या वस्तू या मुद्दाम त्याच काळाच्या दाखवण्यात आल्या आहेत, त्याच जोडीने तिच्या खाली राहणारे काका वाचत असलेलं पुस्तक हे काळचक्राबद्दलचा
आहे; पण त्याचवेळी रणबीरचा समर्पक वापर हा ही
दरी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतोच पण त्याची घालण्यात आलेली सांगड वाखाणण्याजोगी
आहे.
अनेक  ठिकाणी अनेक
गोष्टींचा संयुक्तिक वापर आला आहे. विशेषतः भिंतीवर उगवलेलं पिंपळाचं रोप, मांडणीला लागलेली कोळीष्टके, रणबीरचा मुखवटा, खिडकीला केलेलं 
वर्तमानपत्रांचं आच्छादन,  मिठी
दाखवण्याचं कौशल्य आणि इतर अनेक गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत.
थोडक्यात २०१८च्या
‘बेस्ट ऑफ मराठी’ लिस्टमध्ये ‘गुलाबजाम’ असायला काहीच हरकत नाही.  तुम्ही जर खवैय्या असाल किंवा रसिक असाल तर हा चित्रपट चुकवू नका’च’.  
खवैय्या
रसिक;
सर्वेश शरद
जोशी





