जरासा बचपन लौट आये ।
लहानपण, बचपन, childhood हे आणि असे कुठल्याही भाषेतले समानार्थी शब्द ऐकले कि आपल्यापैकी प्रत्येक जण एक प्रकारचा नॉस्टॅल्जीया, किंवा पुलंच्या शब्दांत 'स्मरणसौख्य' अनुभवत असतो.
या स्मरणरंजना च्या अवस्थेतून बाहेर पडत असताना आपल्याही नकळत आपल्या तोंडून उमटणारे वचन म्हणजे "तेहि नो दिवसा गतः।'' अर्थात "गेले ते दिन गेले"
बालपणावर बोलत असताना हमखास आठवणारा संत तुकारामांचा अभंग म्हणजे 'लहानपण देगा देवा' । आता संतशिरोमणी तुकारामांना ह्यात अपेक्षित असलेले लहानपण हे फार मोठ्या मुश्किलीने टिकवून ठेवावे लागते, असे 'लहानपण' एकदा गेल्यावर परत मिळवणे तर त्याहून अवघड !
पण आपल्याला ह्या उक्तीतून असणार्या 'बालपण देगा देवा' ह्या अर्थावर बोलायचं झालं तर देव आपल्याला हे बालपण काही काळासाठी का होईना परत देत असतो असं म्हटलं तरीही वावगं ठरू नये.
हे जर अधिक सुस्पष्ट करायचं झालं तर प्रत्येकानेच त्याच्या आयुष्यात अनुभवलेल्या एका प्रसंगाचं देता येईल.
जरा आठवा, तुम्ही एखाद्या ट्रेन/बसमधून कुठेतरी जात आहात. तुमच्या बाजूच्या सीटवर एखादं नव्याने आई-बाबा झालेलं जोडपं त्याच्या १-१.५ वर्षाच्या मुलाला घेऊन बसलं आहे. मध्येच काहीतरी होतं आणि ते मूल रडू लागतं.
अशावेळी तुम्हीही तुम्ही कोण आहात ? कुठे आहात ? अशा प्रश्नांबरोबरच ते बाळ तुमच्या ओळखीचं आहे का ? असे अनेक प्रश्नांचं भान न ठेवता त्या मुला/मुली शी बोबडं बोलू लागता, त्याला हरप्रकारे खेळवण्या चा प्रयत्न करता.
असे बोबडे बोल हे त्या मुला च्या माध्यमातून देवाने तुमचं बालपण तेवढ्या वेळासाठी परत दिल्याचं लक्षण नव्हे का ?
माझं हे असं अनेकदा होतं.
परवा माझी बहिण तिच्या १.५ वर्षाच्या मुलाला घेऊन आली होती. येताना तिने त्या रंगीबेरंगी बडीशेप च्या गोळ्या आणल्या आणि त्या पाहून मला राहवलं नाही. मी त्या माझ्या भाच्यासाठी आणलेल्या असूनही मूठभर खाल्या.
त्याच्यासाठी कार्टून नेटवर्क लावलं होतं. तर त्यावर अनेक पिढ्यांमधल्या बच्चेकंपनीचे आवडते टॉम & जेरी त्याचा नेहमीचाच धिंगाणा घालत होते. ते पाहताना मीहि भाच्याइतकाच रंगून गेलो होतो. आणि अगदी एखाद्या लहान मुलाइतकाच निरागस दिसत होतो. (इति मातोश्री)
मध्यंतरी मी अशाच एका कार्टूनचं, माझ्या लाडक्या 'नॉडी'चं टायटल सॉंग रिंगटोन म्हणून ठेवलं होतं.
१ ते १.५ वर्षांपूर्वी एका पाहुण्यांकडे गेलो असताना मी त्या लहान मुलांच्या छोट्या खुर्चीवर बसलो आणि खुर्ची तुटली हे आत्ता लिहित असताना आठवलं.
पण एक मात्र आहे, हे सगळं अगदी ६५+ वयात सुद्धा अनुभवण्यासाठी 'YZ बत्तीस' म्हणतो तसं आपल्यातलं लहान मुलाचं व्हर्जन जिवंत ठेवावं लागतं.
'ते' व्हर्जन माझ्यात जिवंत असल्यामुळेच कि काय पण अशा अनेक प्रसंगांमध्ये मी अजूनही एखाद्या लहान मुलाप्रमाणेच वागतो.
त्यामुळेच असेल कदाचित पण हल्ली तारुण्या मध्येही होणारी 'नावीन्यालर्जी' अर्थात 'आमच्या वेळी हे असं नव्हतं' वगैरे संवाद माझ्या तोंडून कधीच येत नाहीत.
© सर्वेश्वर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा