"रंगभूमीने मला काय दिलं ?" आजच्या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने हा विचार मनात
डोकावला आणि ‘तो’ आठवला.
‘तो’ तसा जरासा भित्राच होता, नवीन काहीही
करायचं म्हटलं की "आपण हे पूर्ण करू शकतो का ?” हि भीती त्याच्या
मनात डोकवायची.
शक्यतो नवीन कुठलीही गोष्ट टाळायचाच ‘तो’ !
‘तो’ तसा
थोडासा लाजरा आणि थोडासा बुजरा ही होता. नव्या माणसांमध्ये वावरायला लाजायचा, जन्मापासून मुंबईकर
असूनही गर्दी टाळण्याचे शक्य तेवढे प्रयत्न करायचा. म्हणूनच टिव्ही आणि पुस्तकं
एवढंच त्याचं जग झालं होतं. बोलतानाही ‘तो’ अडखळायचा, त-त-प-प करायचा.
वर्गातल्या २-३ मुली सोडल्या तर बाकीच्या मुलींकडे ‘तो’ बघायचाही
नाही आणि अगदी त्याचे जवळचे मित्र सोडले तर फार कुणात मिसळायचा नाही. सगळ्यांपासून
अलिप्त राहता राहता त्याने स्वतःचंच विश्व उभारलं होतं स्वतःभोवती. ‘तो’ होता ५-६
वर्षांपूर्वीचा, शाळेतला
सर्वेश !
तो
‘होता’ कारण त्या
सर्वेशपासून आजच्या सर्वेशपर्यंत येताना माझ्यात बरेच बदल घडून आले, घडत आहेत. आज मला
सतत नवीन काहीतरी हाताळायचं असतं, काहीतरी नवीन करायचं असतं,
म्हणूनच नाविन्याने भरलेलं कुठचंही
आव्हान स्वीकारायला आज मी नेहमीच तयार असतो. गेल्या ४ वर्षांमध्ये मी अनेक
वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांना सामोरा गेलोय. आज प्रवास करताना नवनव्या लोकांशी
गप्पा मारणे, त्यांची
मनस्थिती जाणून घेणं हा माझा आवडता छंद झालाय. टीव्ही, कंप्युटर, पुस्तकं यासोबतच अनेक
मित्र-मैत्रिणी माझ्या विश्वात नव्याने सामील झालेत. अगदी मुलींशी बोलायलाही मी
सरावलोय. असे अनेक बदल माझ्यात झाले आणि होत आहेत.
बदलांची ही प्रक्रिया सुरु झाली ती १०वी नंतर, अगदी १० मिनिटांच्या
अंतरात पसरलेलं माझं जग मागे ठेवून कॉलेजच्या नव्या क्षितिजाच्या दिशेने मी पाऊलं
उचलली तेव्हापासून आणि त्याहीपेक्षा मी त्या क्षितिजावर पाऊल ठेवताना ज्याक्षणी
रंगभूमीवर (नाट्यमंडळात) माझं पहिलं पाऊल पडलं तेव्हापासून !
तुम्हांला कदाचित हि आत्मस्तुती वगैरे वाटू शकेल; पण ‘आत्मस्तुती करे तोची एक मूर्ख’ हे मलाही माहितीय. पण मी जे बदल सांगतोय ते मला
पूर्वीपासून ओळखणाऱ्या अनेक माणसांशी बोलत असताना मला कळले, नव्हे, त्यांनीच सांगितले.
माझ्या
बरोबर माझ्या वर्गात शिकलेल्या एका मुलीने बर्याच वर्षानंतर भेटल्यावर मला विचारलं
होतं “ तू
‘तो’च आहेस ना ?”
माझ्या
अगदी तान्हेपणापासून मला ओळखणारे माझे फॅमिली डॉक्टर एकदा बोलता बोलता बोलले होते “ गेल्या ५ वर्षांमध्ये
तुझ्यात अमुलाग्र बदल झालाय. आणि जो बदल झालाय तो पूर्णपणे सकारात्मक आहे. तुझ्यात
एक कॉन्फिडन्स आलाय, त्या
कॉन्फिडन्सच्या जीवावर तू कुठल्याही क्षेत्रात यश मिळवू शकशील.”
५
वर्षे किंवा त्या आधीपासून मला ओळखणारे माझे काही पु.ल.प्रेमी मित्र म्हणतात “५ वर्षांपूर्वी तू ‘सखाराम गटणे’ होतास आणि आज ‘नाथा कामत’ आहेस”
पुलंच्याच
शब्दांत सांगायचं झालं तर, ज्याच्याकडे
पाहिलं तर अतीव करुणे खेरीज इतर कुठलीही भावना जागृत होत नाही अशा कारुण्यभंजन ‘गटण्या’ पासून ते अल्लाघरचा
मोर ‘नाथा
कामता’पर्यंतचा
हा माझा प्रवास किमान माझ्या दृष्टीने तरी सकारात्मकच आहे.
माझ्या
ह्या स्वतःवरच्या ‘प्रयोगां’मध्ये माझ्या काही
मित्र-मैत्रिणींचा मोलाचा वाटा असला;
नव्हे तो आहेच, पण तरीही ‘सिंहाचा वाटा’ वगैरे ज्याला म्हणतात
तो मात्र रंगभूमीचाच !
तुम्ही स्वतःचं सर्वस्व झोकून देऊन एकदा का
रंगभूमीवर पाऊल ठेवलंत, की ही निर्जीव भासणारी रंगभूमी सजीव होते, बोलू लागते तुमच्याशी. मग सुरु होतो दोन प्रकारचा संवाद; एक असतो तुमचा आणि रंगभूमीचा तर दुसरा असतो तुमचा आणि तुमच्या मनाचा !
हा
दुसऱ्या प्रकारचा संवाद सुरु झाला ना कि तुम्हांला स्वतःचा शोध लागतो.
म्हणूनच
मी जरी ‘अभिनेता’ नसलो, जरी माझा ‘रंगभूमीवरचा
प्रत्यक्ष वावर’ हाताच्या
बोटांवर मोजण्याइतपतच असला, तरीही
मला आजचं हे आयुष्य दिलं ते रंगभूमीनेच ! आज मी हे जे विचार करतोय ना ते करण्याची
क्षमतासुद्धा माझ्यात रंगभूमीमुळेच आली.
असं
म्हणतात कि माणसाचा जन्म हा “ कोSअहं
? ” अर्थात
“ मी
कोण आहे ? ” ह्या
एका प्रश्नाभोवती घुटमळत असतो. जर कुणाला खरंच त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या स्वत्वाचा
शोध घ्यायचा असेल तर एकदा, फक्त
एकदा सर्वस्व झोकून रंगभूमीवर उभे राहावं.
तोपर्यंत....
तोपर्यंत माझे स्वतःवरचे ‘प्रयोग’ चालूच आहेत.
रंगदेवता
आणि रंगभूमी ह्या दोघांच्याही आशीर्वादाने स-विनय स-आदर करीत आहे ‘ प्रयोग स्वत्वाचे, स्वतःच्या
अस्तित्वाचे ! ’
- सर्वेश शरद जोशी
दि. २७/३/२०१६
रात्रौ
१०.३० वाजता
तो ‘होता’ कारण त्या सर्वेशपासून आजच्या सर्वेशपर्यंत येताना माझ्यात बरेच बदल घडून आले, घडत आहेत. आज मला सतत नवीन काहीतरी हाताळायचं असतं, काहीतरी नवीन करायचं असतं, म्हणूनच नाविन्याने भरलेलं कुठचंही आव्हान स्वीकारायला आज मी नेहमीच तयार असतो. गेल्या ४ वर्षांमध्ये मी अनेक वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांना सामोरा गेलोय. आज प्रवास करताना नवनव्या लोकांशी गप्पा मारणे, त्यांची मनस्थिती जाणून घेणं हा माझा आवडता छंद झालाय. टीव्ही, कंप्युटर, पुस्तकं यासोबतच अनेक मित्र-मैत्रिणी माझ्या विश्वात नव्याने सामील झालेत. अगदी मुलींशी बोलायलाही मी सरावलोय. असे अनेक बदल माझ्यात झाले आणि होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा