बुधवार, ८ मार्च, २०१७

गाव भावनांचा (भाग २)



एका संध्याकाळी मनवाचा मितला कॉल आला. तिला म्हणे काहीतरी कन्सेप्ट सुचली होती ज्यावर तिला novel लिहायची होती आणि त्यासाठी मितची मदत हवी होती. त्या दोघांनी दुसर्या दिवशी संध्याकाळी CCD मध्ये भेटायचं ठरवलं. दोघेही दुसर्या दिवसाची स्वप्नं पाहत झोपी गेले. पण स्वप्नं केवळ भविष्याचीच असतात का ?

नाही, कारण मुळात स्वप्नं म्हणजे व्यक्ती निद्रावस्थेत असताना तिच्या मनात कसल्याही हस्तक्षेपाशिवाय वाहणारा आठवणी, कल्पना, भावभावना आणि संवेदना यांचा प्रवाह असतो.

त्यामुळेच मितचं आजचं स्वप्न हे थोडं वेगळंच होतं. कारण ते फक्त स्वप्नं नव्हतं तर तो भूतकाळाच्या आठवणी आणि त्याने गतकाळात पाहिलेली भविष्याची स्वप्नं यांचा सुंदर गोफ होता. ती एक कहाणी होती, त्याच्या मनाने रचलेली पण तरीही बहुतांशी वास्तवावर आधारित असलेली. पण खरं सांगायचं तर काही वर्षांपूर्वीच बघितलेली ही कहाणी आजही कागदावर उतरली नव्हती. कारण ‘काही कहाण्या ह्या वाचण्यासाठी, बघण्यासाठी नसतात; तर त्या केवळ जगण्यासाठी असतात’ असं त्याचं मत होतं.
ती कहाणी अनेक पात्रांनी जिवंत झाली असली, तरीही प्रामुख्याने ती मुख्य दोनच पात्रांभोवती घुटमळत होती.त्या कहाणीतला ‘तो’ अर्थातच सरस्वती कॉलेजमधला मितेश म्हणजेच आजचा मित होता तर ‘ती’ होती त्या कॉलेजमधलीच त्याची मैत्रीण मानसी देशपांडे.

सुरुवातीला मितला दिसली ती त्यांची पहिली भेट, त्या दिवशी मराठी वाङ्मय मंडळाच्या जोशी सरांनी त्याला भेटायला बोलावलं होतं. दुसर्या दिवशी मराठी वाङ्मय मंडळाची त्या वर्षातली पहिली मिटिंग होती, त्याआधीच सरांनी नेमकं कशासाठी बोलवलंय, याचा विचार करतकरत मित त्याच्या पल्सरवरून कॉलेजला पोचला. कॉलेजच्या मेन गेटवरून पार्किंग लॉटकडे जाताना त्याला गोड आवाजातली हाक ऐकू आली. त्या हाकेने मितेशने गाडी तिथेच साईडला लावली आणि आजूबाजूला बघू लागला. मितेश थांबलेला बघून ‘ती’ पुढे झाली,

“ आपणच मितेश ना, मी मानसी, आत्ता एफवायबीकॉमला आहे, मला मराठी वाङ्मय मंडळ जॉईन करायचं आहे. मला मिताली म्हणाली कि तुम्ही सांगू शकाल कसं करायचं जॉईन ते” ती म्हणाली.
“ OK ! उद्या सकाळी ११.०० वाजता रूम नंबर २०८ मध्ये मिटिंग आहे तिथे या.” मानसीला न्याहाळत मितेशने म्हणाला.

मानसी अगदी बघेल तो प्रेमात पडेल इतकी सुंदर होती. गोरा वर्ण, नितळ त्वचा, काळेभोर पाणीदार डोळे, तरतरीत नाक, कुठलीही लिपस्टिक न लावताही नाजूक गुलाबी ओठ, गोल चेहरा, नाजूक जीवणी आणि सुडौल बांधा. आपण आत्ताच भेटलेल्या मुलीविषयी काहीतरी विचार करतोय असं लक्षात आल्यावर मितेश अलगद हसला. पहिल्याच भेटीत तो मानसीकडे आकर्षित झाला असावा, असं त्याला मानसीशी बोलताना बघितलेल्या आणि त्यानंतर मुद्दाम त्याला चिडवणार्या प्रतीकला वाटलं.
खरंतर मानसीचं रूप कोणालाही आवडेल असं असलं तरीही तिचा स्वभाव मात्र याविपरीत होता. ती बर्यापैकी अबोल, पटकन चिडणारी, चिडचिड करणारी, फारसे फ्रेंड्स नसलेली अशी होती. तिच्या त्या तरतरीत नाकाला त्यावर ठाण मांडून राहणाऱ्या रागामुळेच तरतरी आली असावी, असं अनेकदा तिच्या मैत्रिणी गंमतीत म्हणायच्या. पण ‘आजच्या जगात जगताना सुंदर मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी ‘राग’ आवश्यक आहे’, असं मानसी म्हणायची. असं काही झालं की तो राग तिच्या नाकावरून डोळ्यात जायचा आणि तिचा एक कटाक्षच तिची छेड काढणाऱ्या मुलांशी लढायला पुरेसा ठरे. याचा अनुभव मितेशने त्याच दिवशी संध्याकाळी घेतला होता.
त्या दिवशी मितेशचा शाळेतला मित्र प्रथमेशचा वाढदिवस असल्याने दुसर्या दिवशी उठायला आणि सगळं आवरून कॉलेजला निघायला मितेशला उशीरच झाला होता. अगदी शक्य त्या वेगात आवरून मितेश घराबाहेर पडला. तो मेन रोडला टर्न मारत होता आणि तितक्यात समोरून येणारी स्कुटी त्याला धडकणार हे त्याच्या लक्षात आलं. त्यानं ब्रेक मारला म्हणून अपघात टळला. नेहमीप्रमाणे त्याच्या तोंडून भकार निघणार एवढ्यात ही ‘मानसी’च आहे हे त्याच्या लक्षात आलं. म्हणून त्यानं ‘भ...’ एवढं म्हणून ओठ दाबले. मानसीसुद्धा कॉलेजला जायलाच निघाली होती, पण आयडी राहिल्याने तो आणायला परत जात होती. मितेशने तिला ‘एखाददिवस आयडी नसेल, तरीही चालेल’ असं सांगितलं, पण नियमांच्या बाबतीत काटेकोर असणार्या मानसीने “कशाला, इथेच तर आहे घर मी पटकन येते जाऊन तुम्ही पुढे झालात तरी चालेल” असं म्हणून ती गेली सुद्धा.
त्या दिवशी मिटिंग मध्ये सगळ्यांना ओळख परेडला सामोरं जावं लागलं. मानसीला असं सगळ्यांसमोर बोलायची भीती वाटायची, त्यामुळे सुरुवातीला तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. पण नंतर मिटिंगमध्ये स्टेजवर उभा राहून मिटिंग हेल्ड करणाऱ्या मितेशने तिला जे चीअरअप केलं त्यानं बुस्ट होऊन मानसी चक्क ५ मिनिटं न अडखळता बोलली, त्यात तिने स्वतः रचलेली एक कवितासुद्धा ऐकवली. मिटिंग संपल्यानंतर मित स्वतः मानसीजवळ गेला आणि गंमतीत मानसीला म्हणाला “ Beauty with Brain म्हणजे rare combination आहेस तू” गंमत म्हणजे एरवी कोणी फ्लर्ट करणार्यावर रागावणारी मानसी गालातल्या गालात हसली.
एका वादविवाद स्पर्धेमध्ये ‘ स्त्री-पुरुष समानता : योग्य कि अयोग्य ’ ह्या विषयावर मत मांडायची होती. मानसी समानतेबाबत आग्रही असल्याचं मितेशला माहित होतं. म्हणून त्यानेच मानसीला स्पर्धेत सहभागी होण्याचा आग्रह केला. पण त्या स्पर्धेमुळे मानसीच मितेशच्या म्हणण्यावर विचार करून त्यानंतर मितेशची मतं मांडू लागली. त्यानंतर अनेक स्पर्धांना दोघे एकत्र जाऊ लागले, कॉलेजला बक्षिसं मिळत होती आणि त्यांची मैत्री वाढत होती.
एकदा मानसीच्या एका कवितेतली एक ओळ मितेशला पटली नाही आणि त्यातूनच त्याच्या पहिल्या कथेने जन्म घेतला. अशाप्रकारे मितेशच्या ‘मित’ होण्यालासुद्धा मानसीच कारणीभूत होती असं मित नेहमी म्हणायचा.

अशा अनेक घटना, अनेक गंमतीजमती होतहोत त्यांची मैत्री वाढत गेली. ह्या सगळ्याची साक्षीदार होती आज भेटलेली मिताली. म्हणूनच हल्ली मानसीची फारच आठवण आली कि मितेश मितालीला फोन करायचा आणि फक्त ‘मानसी’ याच विषयावर बोलत रहायचा. पण मानसी कुठे आहे हे मितालीला सुद्धा माहित नव्हतं. असो !

तर मितेश आणि मानसीची मैत्री वाढत होती, ते दिवसदिवस एकत्र असायचे, आता दोघांना सुद्धा एकमेकांची सोबत हवीहवीशी वाटायची. पण तरीही “आम्ही फक्त चांगले मित्र आहोत” असं दोघेही सांगायचे. पण तरूण आणि तरुणी कधीच ‘चांगले मित्र’ वगरे नसतात असा समज असणार्या समाजाने त्यांच्या मैत्रीवर प्रेमाचा शिक्का मारायला सुरुवात केली होती.

त्यांचे पुढचे काही दिवस असेच एकमेकांच्या सोबतीने सुखा–––––त गेले, ‘आपण मानसीच्या प्रेमात पडलोय’ हे एव्हाना मितेशच्याही लक्षात आलं होतं. ‘प्रेमात पडल्यावर माणूस कवी वगरे होतो’ असं म्हणतात, पण मितेश ह्याचं उदाहरण ठरला होता असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याच्याही नकळत हल्लीच त्याने एक कविता रचली होती. कवितेचे बोल होते, “ तुझ्यासाठी भावनांचा गाव सारा दाटला ” येत्या रोझ डे ला ही कविता वाचून दाखवल्यावर तो मानसीला प्रपोज करणार होता.

रोझडेचा मुहूर्त साधून त्याने प्रपोज केलं खरं, पण “मला विचार करायला वेळ हवाय” हे नेहमीचंच उत्तर त्याला ऐकावं लागलं होतं. त्यानंतर दोन महिने आले आणि गेले. मितेश फक्त मानसीच्या उत्तराचीच वाट बघत राहिला.

आणि VALENTINE DAY ला तिच्याकडून एक चिट्ठी होती, ज्यात तिची नवी कविता होती
“ साथ दे तू माझ्या हसण्याला,
साथ दे तू माझ्या असण्याला,
साथ दे तू माझ्या जगण्याला,
साथ दे तू मला साथ दे तू मला ! ”

अशा रीतीने दोघे एकत्र आले होते आणि दिवस असेच जात राहिले, जात राहिले.

मग एक दिवस मानसी गायब झाली, मानसीच्या घरालासुद्धा कुलूप होतं, मानसीचा फोन सुद्धा स्विच्ड ऑफ होता. त्या दिवसापासून मितेश शोध घेत होता, पण मानसीचा आजवर कुठेच पत्ता लागत नव्हता.

शेवटी एक दिवस कंटाळून मितेशने शोध थांबवला, पण शोध थांबवला तरीही आठवणी थोडीच थांबणार आहेत. अनेकदा मानसीच्या आठवणींनी तो व्याकूळ व्हायचा, रात्ररात्र जागा राहायचा.

तिच्या आठवणीत व्याकूळ झाल्यावर काही कथा, काही कादंबर्या लिहिल्या ज्या त्याच्यासारख्या प्रेमी जीवांवरच आधारित होत्या, आणि त्या प्रेमी जीवांशी तो नेहमीच रिलेट होत होता, त्यामुळंच असेल असेल कदाचित पण आपल्या कथा वाचल्यावर त्याला एक आधार मिळायचा जगण्यासाठी.
मनाच्या आतून भावनांचा प्रवाह जेव्हा शब्दबद्ध होऊन उसळत वाहू लागतो तेव्हा तो उत्कट अविष्कार अनेकांच्या मनातल्या पण मनातच राहिलेल्या वादळांशी जाऊन पोचतो, म्हणून असेल कदाचित पण लोकांना त्याचं हेच लेखन आवडत होतं.
का नाही आवडणार ? कारण त्या भावनांच्या उत्कट अविष्कारासोबतच त्याच्या कथेत होतं प्रेमी जीवांचं स्वप्नरंजन जे त्याने त्या दोन महिन्यात अनेकदा केलं होतं.

असंच स्वप्न तो अजूनही पाहत होता, मानसी परत भेटण्याचं. आणि काही दिवसांपूर्वी त्याला अगदी मानसीसारखीच दिसणारी मनवा भेटली होती, जिचा स्वभावसुद्धा अनेक बाबतीत मानसीशी जुळत होता.
पण असं का ? ती मानसीच होती का ?.....
________________________________________________

#Stay_Tuned

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा