‘बर्रSSSफगोला’ !
आज बर्याच दिवसांनी शाळेजवळ गेलो असताना पुन्हा एकदा खास ठेवणीतला आणि
आठवणीतला आवाज कानांवर पडला, म्हणून त्या बालपण जागवणार्या आणि गाजवणार्या ठिकाणी गेलो.
आमच्या शाळेबाहेरच्या वडाजवळ हा गोळेवाला दर फेब्रुवारीनंतर दिसत असे. जर एखादंवेळ
त्या गोळ्याच्या गाड्यासमोर गर्दी नसेल तरच मधून मधून त्या गोळेवाल्याचा ‘बर्र...फगोला’
असा विशिष्ट शैलीतला आवाज यायचा, पण तो आवाज माझ्या कानांवर कधीतरीच पडायचा. कारण
मी त्याच्या आजूबाजूला असताना त्याला माझ्याशी बोलायलाही सवड नसायची.
त्यावेळीही तो आजसारखाच ‘कालाखट्टा’
दिसत असला, किंवा आजसारखेच तरीही त्यावेळी ते माझ्या मनातही आलं नसावं. म्हणूनच तर
आमची स्वारी दरवर्षी उन्हाळा सुरु झाला कि आठवड्यातून एकदातरी त्याच्याकडे जायची.
त्यावेळी तो मात्र “क्या रे बेटा तेर्को कोन्सा” असं प्रत्येकाला विचारत असायचा
आणि ज्याने त्याने सांगितलेला फ्लेवर बनवून देण्यात मग्न होऊन जायचा. कधी
लाकडाच्या किसणीवर बर्फ किसत असायचा, तर कधी त्या बर्फाचा गोळा करून तो एखाद्या
काचेच्या ग्लासात घेऊन त्यावर सांगितलेला फ्लेवर मारत असायचा, तर कधी त्या गंज
चढलेला वाटावा इतपत जुन्या सिलिंडरमधून सोडा ज्यूस करून द्यायचा. किंमत सुद्धा
अगदी खिशाला परवडेल अशी, फक्त ५ रुपये/-
वेगवेगळ्या वेळी त्याच्याकडे गेलं
म्हणजे वेगवेगळं चित्र बघायला मिळायचं. सकाळी १०.३०ला माध्यमिकवाल्यांची मधली
सुट्टी, त्यामुळे सगळी त्यांचीच गर्दी. दुपारी १२.३०ला माध्यमिक शाळेची सुटण्याची
आणि प्राथमिकची भरण्याची एकच वेळ, त्यामुळे गर्दीचा पण ‘मिक्स’ होऊन जायचा. दुपारी
३.३०च्या मधल्यासुट्टीत रखवालदार सरमळकरमामांची नजर चुकवून पळालेला एखाद-दुसरा प्राथमिकवाला
[कारण बाकीच्यांची कितीही इच्छा असली तरीही त्यांना ‘पोषण आहारा’ वरच समाधान
मानावं लागायचं.], आणि संध्याकाळी ५.३०वाजता शाळा सुटल्याच्या आनंदात गोळा
खाणार्या प्राथमिकवाल्यांच्या गर्दीत हरवलेली एखादी आई किंवा ताई. आता माझ्या
वयोमानानुसार येणाऱ्या वेळेत त्या गर्दीत मीही असायचो, हि गोष्ट वेगळी !
आपण एखाद्या शिक्षकाचे/शिक्षिकेचे ‘लाडके’
आहोत आणि तो/ती ( माध्यमिकमध्ये असताना शिक्षकांपाठी त्यांचे उच्चारण सहसा एकेरीच
होते.) आपल्यालाच कामं सांगतो ह्याचा एरवी जरी राग येत असला तरीही उन्हाळ्यात तीच
कामं हवीहवीशी वाटायची कारण “उरलेल्या पैशाचं तुला चॉकलेट घे रे” असं त्यांनी
सांगितल्यामुळे त्याच पैशांतून शाळेच्या तासांमध्ये मित्रांना चिडवून शाळा
सुटल्यावर गोळा खाता यायचा.
कधीकधी आई कामं सांगायची, तेव्हा त्या गोळ्याच्या ५ रुपयांसाठीच कामं करायचो,
तर कधीकधी हट्ट करून घ्यायचो आईकडून. कधीकधी तर आईला पेन हवाय, पेन्सिल हवीय असं खोटंच सांगायचो. पर बरफगोला के लिये सबकुछ माफ
है !
अशाप्रकारे अनेक आठवणींचा गोळा मनानं दाटला, त्या गोळ्याने जागवलेली दोस्ती, प्रेम,
उधारी आणि दुनियादारी असे सारे फ्लेवर त्या गोळ्यात होते. दुनियादारीवरून आठवलं,
त्या ‘दुनियादारी’ मध्ये एक डायलॉग आहे बघा, “दिग्याबरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो,
दिग्या माझा पहिला फ्रेंड” असे अनेक फ्रेंड त्या गोळ्याने मला दिले.
असा तो ‘आठवणींचा बर्र्फगोला’ हातात घेऊन पुन्हा एकदा लहानपणात गेलो. मनानं शाळेच्या
त्या हाफचड्डीत, त्या गोलावाल्यासमोर उभा राहिलो. आपसूकच तोंडातून बाहेर पडलं;
“अन्ना
एक कालाखट्टा”
काय मग
तुमचा आवडता फ्लेवर कुठला ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा