शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

सुख म्हणजे नक्की काय असतं ?

“मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं ? ...” परवा व्हॉट्सॅपवर दिग्गज अभिनेता प्रशांत दामलेंच्या ‘एका लग्नाची गोष्ट’ नाटकातली ह्या गाण्याची व्हिडियो आली. व्हिडियो पाहता पाहता माझं मन कुठेतरी हरवलं, अंतर्मुख होऊन विचार करू लागलं.

    आपण; म्हणजे तुम्ही, मी, आपण सगळेच; आयुष्यात नेहमीच सुखाच्या मागे लागलेलो असतो. सुखी होण्याचे नानाविध पर्याय अविरत पडताळून पाहत असतो, इतकं कि जरासा विचार करून कुणी ‘सुखी होण्याचे १००० पर्याय’ नावाचं पुस्तक लिहिलं तर ते बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीत सर्वात वरचं स्थान मिळवेल एवढं निश्चित ! आपण सुखाच्या इतकं शोधात असतो कि देवालासुद्धा ‘सुखकर्ता’, ‘दुःखहर्ता’ अशा उपमा देतो. पण खरं सांगा, सुखं म्हणजे नेमकं काय यावर आपण कधी विचार केलाय का ?

    सुख म्हणजे नेमकं काय ? ह्या शोधात असताना मी आपण ज्यांना सुख म्हणतो अशा विविध गोष्टींची एक यादी केली. आनंदात असणे; आर्थिक,शैक्षणिक व कौटुंबिक बाबतीत यशस्वी असणे; सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात अधिकारी पदावर असणे; मनासारखा जोडीदार व भरपूर कुटुंबस्वास्थ्य असणे; मुले कर्तबगार असणे; भरपूर स्थ्यावर व जंगम मालमत्तेचा मालक असणे; दिमतीला भरपूर नोकरचाकर असणे; ऐसपैस सर्व सुखसोयींनी युक्त बंगला असणे; दिमतीला आधुनिक महागड्या मोटारी चा ताफा असणे; समाजात मान मतराब असणे;   अनिर्बंध सत्तधीश असणे; सत्संग व अध्यात्मातील प्रगतीमुळे समाधानी असणे;.................इत्यादी इत्यादी. अशी बरीच मोठी यादी तयार झाली, थोड्या वेळाने लक्षात आलं कि हि यादी कधीच न संपणारी आहे. कारण सदैव अतृप्त, असंतुष्ट, असमाधानी असणे हा मानवी मनाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे सर्वसामान्यतः मानव हा सदैव जे आहे त्याहून अधिक मिळवण्याची खटपट करत राहतो.


     वरील यादीतील गोष्टींचा समावेश आपण सर्वसाधारणपणे ‘सुख’ ह्या संकल्पनेत करत असलो तरीहि हा आपला गैरसमज आहे हे विचार केल्यावर लक्षात घेतं. लहानपणी ‘सुखी माणसाचा सदरा’ नावाची एक गोष्ट वाचली होती. 


    एक श्रीमंत सावकार होता, त्याच्याकडे धनदौलत, गाड्या, बंगले, नोकर-चाकर, सुंदर पत्नी, सुसंस्कारी मुलं असं सुखाच्या सर्वसाधारण संकल्पनेत बसणारं सारं काही होतं. पण तरीही त्याला सुखाची झोप मिळत नव्हती. एक दिवस देव त्याच्या स्वप्नात आला आणि त्याने त्या सावकाराला विचारलं. “बाळा, मी तुला सारं वैभव देऊनसुद्धा तू तृप्त का नाहीस ?” “देवा, माझ्याकडे सारं वैभव असलं तरीही मी सुखी नाही मला प्लीज सुखी कर” असं म्हटल्यावर देवाने सावकाराला एक उपाय सांगितला “सुखी माणसाला शोध आणि त्याचा सदरा घाल म्हणजे तुही सुखी होशील.” सावकार सुखी माणसाचा शोध घेऊ लागला, तो राजेरजवाडे, महात्मा, साधू वगैरे प्रत्येकाला भेटू लागला. सावकाराने सुखी माणसाच्या शोधात जंगजंग पछाडले. पण त्याला काही करून सुखी माणूस भेटला नाही. जो जो भेटला तो तो त्याला आपल्या चिंता सांगू लागला. अशी ती कथा !

ह्याचाच अर्थ आपण ढोबळमानाने सुखाच्या ज्या सर्वसाधारण संकल्पना करून घेतल्या आहेत, त्यात काहीतरी गडबड आहे. 

कदाचित म्हणूनच समर्थ रामदास हि मनाला बोध करत असताना सांगतात;
 “जगी सर्वसुखी असा कोण आहे ? विचारी मना तूची शोधूनी पाहे”


पण  दुर्दैवाने अनेकांना याचे भान मरेपर्यंत येत नाही तर काहींना आयुष्याच्या संध्याकाळी सुखाचे भान येते पण वेळ गेलेली असते! आयुष्यातल्या कितीतरी आनंदाला  आपण मुकलो आहे याचे भान सरत्या आयुष्यात आल्यानंतर माणूस अजूनच दु:खी होतो.पण तोपर्यंत सगळ हातातून निसटलेले असते. मग सुख म्हणजे नेमकं काय ?


तर सुख म्हणजे जे आहे त्यात समाधान मानणे !

कविवर्य मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे, त्यात ते म्हणतात; 

“पेला अर्धा भरला आहे, अस सुध्दा म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे, अस सुध्दा म्हणता येतं.

सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचंतुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं?”     


                           ह्या कवितेप्रमाणेच आयुष्याच्या पेल्याकडे आपण दृष्टीकोनातून बघतो, तो दृष्टीकोनच आपण सुखी आहोत कि नाही हे ठरवत असतो. म्हणूनच सुखाची शोध घेण्याची पहिली पायरी म्हणजे आत्मपरीक्षण !
  आपण आपल्याकडेच, आपल्याच दैनंदिन जीवनाकडे, आपल्यासोबतच घडणाऱ्या घटनांकडे तिऱ्हाईत नजरेने पाहून त्यावर तटस्थपणे विचार करणे सुखी होण्यासाठी अत्यावश्यक असते. असे केल्यास आपल्या दैनंदिन आयुष्यातील छोट्याछोट्या पण तरीही अत्यानंद, आंतरिक समाधान देणाऱ्या घटना, गोष्टी आपल्याला दिसू लागतात. त्यानंतर हा आनंद साजरा करायला हवा. यातूनच आपल्याला खरे सुख मिळत असते. म्हणूनच माणसाने आयुष्य साजरं करायला शिकलं पाहिजे म्हणजे त्याला सदैव सुखाच्या राशीत राहता येते.


  पण आपलं जगणं साजरं करत असताना सुद्धा सतत आत्मपरीक्षण चालू राहायला हवं. आपल्या सुखाच्या, आनंदाच्या नादात आपण दुसऱ्यांना दुखावत तर नाही ना ? ह्याचा विचार करायला हवा. आपण सर्वसामान्य माणसे हीच गोष्ट अनेकदा जाणीवपूर्वक विसरतो पण नंतर आपलेच मन याबद्दल आपल्याला खात राहते, आत कुठेतरी आपण असे वागलो याची सल आपल्याला टोचत राहते.


   त्यामुळे सदैव जगणं साजरं करत राहणे आणि कुठल्याही परीस्थितीत इतरांच्या दुःखाचं कारण न होणे ह्या दोन गोष्टींचा मिलाफ म्हणजे सुख !

 म्हणूनच ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे ?’ ह्या रामदासांच्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना मला एकवीस वर्षात स्वानंदसमाधी घेणारे ‘संत ज्ञानेश्वर’ हे सर्वसुखी वाटू लागतात. वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी भगवद्गीतेसारख्या अलौकिक ग्रंथावर टिपण लिहून झाल्यावर ह्या तरुणाने विश्वस्वरूप देवतेकडे कोणते दान मागितले, तर पसायदान, अवघ्या विश्वाच्या सुखाचे दान ! अशी वृत्ती शतांशाने तरी आपल्या अंगी बाणवायला हवी असं मला वाटतं.

म्हणूनच आपणहि जगणं साजरं करायला शिकूया, कुठल्याही स्थितीत इतरांच्या यातनेचे कारण न बनण्यासाठी प्रयत्न करूया. म्हणजे बघा आयुष्य कसं सुखी होऊन जाईल ते !                               
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा