स्वेच्छानिवृत्ती अर्थात VOLUNTARY RETIREMENT; आपण
अनेक शब्द अत्यंत मोघमपणे वापरतो, त्यातलाच हा एक शब्द !
आज व्यवसाय-नोकरी-धंद्यातून स्वेच्छानिवृत्ती घेऊ पाहणार्यांची संख्या वाढत असली तरीही त्यांना स्वतःच्या संसारातून, पर्यायाने मुलांच्या संसारातून स्वेच्छा-निवृत्ती घेणे जमत नाहीय.
आत्ता JKD अर्थात JAYASHREE Khadilkar Deshpande काकूची एक पोस्ट वाचनात आली; ज्यात तिने वाढत असलेल्या ‘अजुनी यौवनात मी’ ह्या प्रवृत्तीचा प्रश्न अधोरेखित केला होता. 'Moving on v/s just not giving up' हे पोस्टचे शीर्षकच बरंच काही सांगणारं आहे, पण तिने त्यात केवळ शॉपिंग-खरेद्या, ड्रेसिंग अप, पार्ट्या, हॉटेलिंग, टीव्ही-नाटक-सिनेमे, प्रवास कशाकशातून कुणी थांबायलाच तयार नाही असं दिसतंय एवढंच म्हटलंय.
पण मध्यंतरी लोकसत्तामध्ये 'नवा डाव मांडताना' ह्या शीर्षकाखाली एक लेख आला होता. [ LINK : http://www.loksatta.com/shishiratla-vasant-news/new-married-life-1275336/ ] ह्या लेखात पूर्वीचा साथीदार दुर्दैवाने स्वर्गवासी झाल्यानंतर होणार्या पुनार्विवाहांच्या वाढत्या संख्येवर आणि अशा जोडप्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली होती. त्या हि सदराचे नाव ‘शिशिरातला वसंत’ असेच होते.पण आपण ‘तरुण’ किंवा ‘प्रौढ’ कधी हे असं का होतंय ? प्रौढत्वी शैशव जपण्याची इतकी आस का लागलीय ? शिशिरातही वसंत का फुलतोय ह्याचा विचार केलाय का ?
आत्ता म्हातारपणात असलेली
आणि आपण ज्यांच्याबद्दल असं म्हणतोय, ती पिढी हि पैशाच्या मागे लागण्याची स्पर्धा
सुरु झाल्यावरची पहिली किंवा फार फार तर दुसरी पिढी !
हा संघर्ष जरी प्रत्येक
पिढीगणिक वाढता असला तरीही त्यापूर्वी शेती, सावकारी, भिक्षुकी अशा परंपरागत
व्यवसायातून पोट भरत असे आणि उच्चवर्णीय घरांमध्ये जोडीला पिढ्यानपिढ्या चालत
आलेली सुबत्ता होती किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अज्ञानाच्या अंधारामुळे आहे
त्यात समाधान मानण्याची वृत्ती होती.
पण कुळ कायदा लागू झाल्याने उच्चवर्णीय कुटुंबांकडे
असलेल्या जमिनींचे विकेंद्रीकरण झाले. कुळांच्या घरातही कुळ कायद्याने भांडणतंटे
सुरु झाले.
पूर्वापार चालत आलेले व्यवसाय आणि परंपरागत धन हअपुरे पडू लागल्यामुळे एकत्र कुटुंबातील भाऊ विभक्त झाले आणि एकत्र कुटुंब पद्धतीवर घाव बसायला सुरुवात झाली. मग विभक्त झाल्यानंतर जगण्याचे मुलभूत साधन असणार्या पैशांची गरज प्रचंड प्रमाणात वाढली.
मग पर्यायाने नोकरी करणाऱ्या नोकरदार,
कामगारांचा नवा वर्ग उदयास आला. ह्या वर्गात पुरुष तर होतेच पण सावित्रीबाई आणि महात्मा
फुले अशा समाजसुधारकांनी दिलेल्या लढ्यामुळे शिकलेल्या महिला सुद्धा होत्या. ह्या पहिल्या पिढीतील नोकरदारांचे काही प्रश्न,
काही सल आहेत.
पैशांची वाढती गरज भागवण्याच्या धावपळीत स्वतःसाठी
जगण्याचं राहून गेलंय. मुलांसाठी, मुलांच्या शिक्षण-भविष्यासाठी खस्ता खाणार्या
ह्या पिढीच्या सदस्यांना आपल्या जोडीदारासोबत फार काळ घालवता आला नाहीय. इतकंच कशाला तर त्यांच्या मुलांमध्ये आणि त्यांच्यामध्ये एक मानसिक दरी उत्पन्न झालीय, मुलं त्यांच्यापासून दुरावली आहेत. जेव्हा व्यवसाय-नोकरी-उद्योगातून निवृत्ती घेतल्यावर म्हातारपणी हे जास्त
प्रकर्षाने जाणवू लागतंय.ह्याची बोच, हाच सल त्यांना मोठ्या प्रमाणात जाणवू लागतो. आणि म्हणूनच त्यांना तरुणपणी राहिलेल्या ह्या गोष्टी म्हातारपणी अनुभव्याशा वाटत आहेत.
पण आपण मात्र त्यांना अनेकदा चुकीचे ठरवून मोकळे
होत आहोत, त्यांना आपल्या संसारात लक्ष घालण्याची काय गरज आहे असं त्यांच्या वाटतंय. यांमुळे कौटुंबिक वादांची संख्या दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढतेय.
पण म्हणून आपण त्यांना दोषी ठरवण्यापेक्षा त्यांना
समजून घेणं अत्यावश्यक आहे.
याचबरोबर हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं कि
आपणहि उद्या त्यांच्या जागी असणार आहोत, तेव्हा आपल्या मुलांच्या आपल्याकडून
त्याकाळात असणार्या असणार्या अपेक्षा ह्या आत्ता आपल्या त्यांच्याकडून अपेक्षांशी
मिळत्या-जुळत्या आहेत. तेव्हा आपण जेव्हा त्या वयात पोचू, तेव्हा जर आपल्या पुढच्या
पिढीने जर अशा अपेक्षा धरल्या तर त्यांनाही समजून घ्यायला हवंय.
शेवटी काय, तर आयुष्याच्या ह्या पाऊलवाटेवर चालत
असताना आपण आपल्या आयुष्यात साथ देणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांना समजून घ्यावेच लागते.
फक्त त्यांनाही न दुखावता या गोष्टीची जाणीव समंजसपणे करून दिली, आणि त्यांनीही या
गोष्टीचा स्वीकार करून आपल्यात बदल घडवून आणण्याचा समंजसपणा दाखवला तर आयुष्य सोपे,
सुलभ, सहज आणि सुंदर होऊन जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा